दररोज बायबल वाचण्याची दहा कारणे

आठवड्याच्या सुरुवातीला, भाग क्रमांक १५१० मध्ये, आपण एखाद्याला ख्रिस्ताबद्दल कसे मार्गदर्शन करावे याबद्दल बोललो, आणि पास्टर जॉन यांनी आपल्याला चार “खजिन्याच्या पेट्यां”मधून मार्गदर्शन केले.
आज आपण नव्या विश्वासणाऱ्यांशी संवाद साधत आहोत. हा संदेश एका अनामिक श्रोत्याकडून आलेल्या ईमेलवर आधारित आहे — तो स्वतःही एक नवा विश्वासणारा आहे.

तो लिहितो:

प्रश्न : “पास्टर जॉन, या पॉडकास्टसाठी धन्यवाद. मला बायबलविषयी किती कमी माहिती आहे, हे जाणवून मी भारावून गेलो आहे. पवित्र शास्त्राचे योग्य ज्ञान मला मिळावे, जेणेकरून ते माझे मार्गदर्शन करील आणि भविष्यात मी त्याच्या आधारे इतरांनाही मार्गदर्शन करू शकेन, अशी माझी इच्छा आहे. पण शिकण्यासारखे इतके काही आहे की सुरुवात कुठून करावी, हेच मला कळत नाही. एखाद्या वर्गातील परीक्षेसाठी अभ्यास करताना, परीक्षेत येणाऱ्या महत्त्वाच्या विषयांची यादी असते; पण बायबलच्या बाबतीत असे वाटते की परीक्षा म्हणजेच जीवन आहे, आणि तयार राहण्यासाठी मला नेमके काय माहित असणे आवश्यक आहे, हे मला समजत नाही — माझे म्हणणे तुम्हाला कळते ना? म्हणजेच, मी सुरुवात कुठून करू? ख्रिस्ताचे अनुसरण करण्यासाठी, त्याचे वचन वाचताना मला सर्वात पहिले आणि अत्यावश्यक काय जाणून घ्यायला हवे?”

उत्तर:तर, माझे उत्तर कदाचित थोडेसे निराशाजनक वाटेल, कारण तो बायबलमधील एखाद्या ठरावीक सत्याबद्दल विचारत आहे; आणि माझे उत्तर असे असेल:
“बायबल, बायबल, बायबल, बायबल.”

अत्यंत आवश्यक
मी आजवर असा कोणताही परिपक्व , फलदायी, समर्थ, आध्यात्मिक विवेक असलेला ख्रिस्ती व्यक्ती पाहिलेला नाही जो शास्त्रवचनांनी भरलेला नाही, जो नियमितपणे शास्त्रवचनांच्या मननात मग्न नाही आणि जो बायबल पाठांतराद्वारे ते हृदयात साठवत नाही — आणि हा काही अपघात नाही. म्हणून, मला आमच्या नवीन विश्वासू मित्राला हे पटवून द्यायचे आहे की, ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर हे अत्यंत आवश्यक आहे की त्याने — आमूलाग्र, सखोल आणि अनुभवात्मकपणे समर्पित व्हावे — अढळपणे, अविचलपणे ही खात्री बाळगावी की — शास्त्रवचन वाचणे, त्यावर मनन करणे, ते समजून घेणे, पाठ करणे आणि त्यात आनंद मिळवणे हे ख्रिस्ती जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे, ज्यामध्ये दररोज वचनात राहणे समाविष्ट आहे, या उद्देशाने की आपण तिथे देवाला भेटू आणि हळूहळू त्याच्या सत्याचे गौरव आपले जीवन व्यापून टाकेल व त्याचे रूपांतर करेल.
आणि हे त्यांना किंवा इतरांना उघड वाटेल, परंतु ते तसे नाही, कारण मी अशा अनेक जुन्या ख्रिस्ती लोकांना ओळखतो जे असे करत नाहीत. ते असे करत नाहीत आणि ते कित्येक वर्षांपासून ख्रिस्ती आहेत, परंतु ते निरुत्साही आहेत. त्यांना वाटते की हे ऐच्छिक आहे कारण त्यांना आधीच खूप काही माहिती आहे आणि ते इतर अनेक पुस्तके वाचतात. मी ही अजिबात चांगली सवय मानत नाही. मला वाटते की हे धोकादायक आहे.

दररोज बायबल वाचण्याची दहा कारणे
म्हणून, माझा यावर विश्वास का आहे याची माझ्याकडे दहा कारणे आहेत — बायबल वाचन, बायबल समजून घेणे आणि बायबल पाठांतर ख्रिस्ती जीवनासाठी आवश्यक बनवण्याची दहा कारणे. त्या स्वावलंबी भावनेचा प्रतिकार करा जी म्हणते, “मला दररोज शास्त्रवचनाची गरज नाही.” ही माझी दहा कारणे आहेत.

१. शास्त्रवचन तारण देते.
‘आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव; त्यातच टिकून राहा; कारण असे केल्याने तू स्वत:चे व तुझे ऐकणार्‍यांचेही तारण साधशील.’१ तीमथ्य ४:१६
“देव शास्त्रवचनाद्वारे आपले दररोज तारण करतो.”
तारण देवाच्या लोकांसाठी घडून आले आहे, तारण — या क्षणी — घडत आहे, आणि देवाच्या लोकांच्या पुनरुत्थानाच्या वेळी तारणाची पूर्णतः होईल, आणि हे आता साधनांद्वारे घडत आहे. पौल म्हणतो की सुशिक्षणाला घट्ट धरून राहा आणि त्याद्वारे स्वतःचे तारण कर.देव दररोज शास्त्रवचनाद्वारे आपले तारण करतो.

२. शास्त्रवचन सैतानापासून मुक्त करते.
तुम्हांला सत्य समजेल व सत्य तुम्हांला बंधमुक्त करील. (योहान ८:३२)
तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही; कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो; कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे. (योहान ८:४४).
सैतान तुमचा शत्रू आहे, तरुण ख्रिस्ती मित्रा. तो तुमच्यापेक्षा हजार पटीने बलवान आहे. म्हणून, योहान तरुण विश्वासणाऱ्यांना लिहितो,
तरुणांनो, मी तुम्हांला लिहिले आहे, कारण तुम्ही बलवान आहात. तुमच्या ठायी देवाचे वचन राहते आणि त्या दुष्टाला तुम्ही जिंकले आहे. . (१ योहान २:१४)
अलौकिक शत्रूवर विजय मिळवण्याची हीच आपली एकमेव आशा आहे.
जेव्हा-जेव्हा सैतानाने येशूला परीक्षेत टाकले (मत्तय ४:१-११ ; मार्क १:१२-१३; लूक ४:१-१३), तेव्हा येशूने “आत्म्याची तलवार, म्हणजे देवाचे वचन” (इफिस ६:१७) याने प्रत्युत्तर दिले.ते वचन त्याच्या मनात कोरलेले होते, म्हणून वाळवंटात त्याला पुस्तक बरोबर घेऊन फिरण्याची गरजच नव्हती.

३. शास्त्रवचन कृपा आणि शांती प्रदान करते.
देव आणि आपला प्रभु येशू ह्यांच्या ओळखीने तुम्हांला कृपा व शांति विपुल मिळो. (२ पेत्र १:२)
शास्त्रवचनाद्वारे मिळवलेले देवाचे ज्ञान हे कृपेसारखेच नाही, परंतु पेत्र म्हणतो की ते कृपेचे एक साधन आहे. जर आपल्याला दैवी कृपेद्वारे शांतीपूर्ण आणि सामर्थ्यवान व्हायचे असेल, तर पेत्र म्हणतो की ते “देव आणि आपला प्रभु येशू ह्यांच्या ओळखीने” घडते. ते ज्ञान एकाच ठिकाणी मिळते: शास्त्रवचन.

४. शास्त्रवचन पवित्र करते.
येशूने प्रार्थना केली,
त्यांना सत्याने पवित्र कर; तुझे वचन सत्य आहे. (योहान १७:१७)
“आपल्या सर्वांना काही प्रमाणात देवाचे वचन हाताळण्याचे काम सोपवण्यात आले आहे.”
पवित्रीकरण ही पवित्र होण्याची प्रक्रिया आहे — म्हणजेच ख्रिस्तासारखे आणि देवासारखे बनणे, जो पूर्णपणे पवित्र आहे. हे ऐच्छिक नाही. इब्री १२:१४ म्हणते, “ज्यावाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळवण्याचा ‘झटून प्रयत्न करा.”
आपण या जीवनात परिपूर्ण होत नाही, परंतु आपण प्रगतशीलरित्या पवित्र होतो. देव आपल्या लोकांना पवित्र करतो. आणि येशू आपल्या पित्याला प्रार्थना करतो, “त्यांना सत्याने पवित्र कर; तुझे वचन सत्य आहे.” हे अधिक स्पष्ट किंवा महत्त्वाचे आहे हे सूचित होते .

५. शास्त्रवचन आनंद देते.
तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झालात;(१ थेस्सलनीकाकरांस १:६)
तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. (स्तोत्र १:२)
आनंदाशिवाय जीवन असह्य आहे. ख्रिस्ती जीवन हे अनेक संकटांचे जीवन आहे. परंतु त्या सर्वांमध्ये, देव आनंद टिकवून ठेवतो आणि तो शास्त्रवचनांद्वारे हे करतो .

६. शास्त्रवचन विनाशकारी चुकांपासून आपले रक्षण करते.
देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत, प्रौढ मनुष्यपणाप्रत, ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा वृद्धीच्या मर्यादेप्रत आपण सर्व येऊन पोहचू तोपर्यंत दिले;
ह्यासाठी की, आपण ह्यापुढे बाळांसारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गास नेणार्‍या युक्तीने, प्रत्येक शिकवणरूपी वार्‍याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये.(इफिस ४:१३–१४)

तरुण ख्रिस्ती लोकांनी सांस्कृतिक आणि तात्विक वाऱ्यांनी व मतांनी भरकटणे कसे थांबवावे? उत्तर: “विश्वासाचे ऐक्य आणि देवाच्या पुत्राचे ज्ञान” — असे ज्ञान जे त्यांना माणसाचे मत म्हणून नव्हे, तर देवाचे वचन म्हणून अनुभवता येते. ते एकाच ठिकाणी सापडते: शास्त्रवचनात.

७. शास्त्रवचन ही स्वर्गाची आशा आहे.
माझा अर्थ असा आहे की शास्त्रवचनातील सत्याचे पूर्ण आकलन आणि पूर्ण आनंद केवळ स्वर्गातच अनुभवला जाईल.
कारण हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट असे दिसते; परंतु नंतर आपण साक्षात पाहू. आता मला कळते ते अपूर्ण आहे; पण नंतर, मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे, मी पूर्णपणे ओळखीन. (१ करिंथ १३:१२)
देवाचे ज्ञान — ती सर्व पूर्णता जी एक निर्मित व्यक्ती योग्यरित्या समजू शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो — ती आपल्यापासून अनिश्चित काळासाठी रोखून धरली जाणार नाही. आपल्या सध्याच्या समजण्याच्या आणि आनंदाच्या मर्यादांचा त्रास दूर केला जाईल. मग, येणाऱ्या युगात जो आपला अंतिम आनंद असणार आहे, त्यात आपण आतापासूनच वाढत जाणे किती योग्य आहे.

८. काही लोक शास्त्रवचनाला विरोध करतील.
कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, तर आपल्या कानांची खाज जिरावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणांसाठी शिक्षकांची गर्दी जमवतील, (२ तीमथ्य ४:३)
दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, आपल्याला शास्त्रवचने माहित असणे आवश्यक आहे जेणेकरून आपण गाफील राहू नये किंवा आपला तोल जाऊ नये किंवा खोट्या शिक्षकांद्वारे आपण भरकटले जाऊ नये. जे शास्त्रवचनांचा स्वीकार करण्यास नकार देतात, त्यांना सामोरे जाण्यासाठी आपण नियमितपणे शास्त्रवचने ग्रहण करणे आवश्यक आहे.

९. शास्त्रवचनाची योग्य हाताळणी देवाला मान्य आहे.
सत्याच्या वचनाची योग्य विभागणी करून नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा स्वत:ला सादर करण्यास होईल तितके कर. (२ तीमथ्य २:१५)
एखादे अत्यंत महत्त्वाचे काम सोपवले जाणे आणि मग प्रभूने तुम्ही केलेल्या कामावर पसंती दर्शवणे ही खूप मोलाची गोष्ट आहे. आपल्या सर्वांना काही प्रमाणात देवाचे वचन हाताळण्याचे काम सोपवण्यात आले आहे. प्रभूला संतोष देण्याची ही किती अद्भुत संधी आहे.

१०. शास्त्रवचन जीवन देते आणि टिकवते.
“‘मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणार्‍या वचनाने जगेल,’ असा शास्त्रलेख आहे.”(मत्तय ४:४)
आध्यात्मिक जीवन — सार्वकालिक जीवन — अगदी शारीरिक जीवनाप्रमाणेच, केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या वचनाद्वारे पोषण केले जाईल . जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे सार्वकालिक जीवन हे नरकाविरुद्धच्या एका लसीसारखे आहे, ज्याला कोणत्याही पोषणाची गरज नाही, तर तुम्हाला आध्यात्मिक जीवन म्हणजे काय हे समजलेले नाही.
म्हणूनच तरुण विश्वासणाऱ्यानी आपल्या संपूर्ण शक्तीनिशी — म्हणजे देवाने त्यांना दिलेल्या सर्व शक्तीनिशी — असा ठाम निर्धार करायला हवा की, पवित्र शास्त्रांचे वाचन, त्यावर मनन, त्यांचा योग्य अर्थ समजून घेणे आणि ते पाठांतर करणे, हे त्यांच्या ख्रिस्ती जीवनात अत्यावश्यक व अजिबात तडजोड न करता पाळायचे मूलभूत घटक असतील.

Shopping Cart
Scroll to Top